भक्तीचरणदास महाराज
पंचवटी …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्यात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत साधुग्रामसाठी आवश्यक जागांचे अधिग्रहण तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास महाराज यांनी दिली. जगन्नाथ रथोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला अपेक्षित वेग मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
महंत भक्तीचरणदास महाराज म्हणाले की, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी आता चार वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. एवढ्या कमी वेळेत कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेली सर्व विकासकामे पूर्ण करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने आणि युद्धपातळीवर कामांना गती देणे आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने साधुग्राम हा सर्वात महत्त्वाचा विषय असून, अद्याप त्यासाठी आवश्यक जागांचे अधिग्रहण पूर्ण झालेले नाही. अनेक जागा मूळ मालकांनी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिल्यामुळे त्या रिकाम्या करून घेण्यास वेळ लागणार आहे. साधुग्रामसाठी मोठ्या प्रमाणावर सलग जागेची आवश्यकता असल्याने अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी भूमिका साधू-महंतांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामकुंड परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने सर्व बाजूंनी खोदकाम झाले आहे. त्यामुळे भाविकांना रामकुंडाकडे जाणेही कठीण झाले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे आणि रस्त्यांची दुरुस्ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याची मागणीही मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे महंत भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले. प्रशासनाने नियोजित मुदतीत सर्व प्रकल्प पूर्ण करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.